गजाननराव वाटवे करंडक मराठी भावसंगीताची स्पर्धा
'नवे शब्द ... नवे सूर' (वर्ष ५ वे )

स्वरानंद प्रतिष्ठान आणि जेष्ठ भावगीत गायक कै. गजाननराव वाटवे यांचे कुटुंबीय यांच्या सहयोगाने प्रतिवर्षी मराठी भावसंगीताची एक अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात येते.या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. सध्याच्या वातावरणात नवे ताजे भावसंगीताचे अविष्कार व्यक्त होण्याची संधी न राहिल्याने अभिजात नवनिर्मितीची गळचेपी होत आहे, त्याकडे दुर्लक्ष होत आहे यातून मार्ग काढण्यासाठी स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे 'नवे शब्द ... नवे सूर' ही केवळ मराठी भावसंगीताची स्पर्धा मुद्दाम आयोजित केली आहे, याद्वारे नवे कवी-गीतकार, नवे संगीतकार आणि नवे भावगीत गायक-गायिका ह्यांचा शोध घेणे आणि त्यांना प्रकाशात आणणे हे ह्याचे मुख्य प्रयोजन आहे.

या स्पर्धेत भव्यतेपेक्षा आंतरिक गुणवत्तेवर प्रमुख भर देणे हा या उपक्रमाचा प्रधान हेतू आहे. चांगले शब्द सुंदर चाल आणि त्या शब्द स्वरांना न्याय देणारी भावगायकी हे तीन मुलभूत घटक या स्पर्धेमध्ये लक्षात घेतले जातील. आधुनिक मराठी भावगीताचे प्रमुख उद्गाते गजाननराव वाटवे यांच्या नावाने ही स्पर्धा घेतली जाते. ह्या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना 'स्वरानंद' चे अध्यक्ष प्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांची आहे


स्पर्धेमध्ये एकूण दोन टप्पे असतील प्राथमिक व अंतिम - स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी (प्रत्यक्ष सादरीकरण नसल्याने)स्पर्धक संघाने प्रवेश अर्जासोबत कमीतकमी तीन व अधिकाधिक पाच भावगीतांची ध्वनिमुद्रित सीडी पाठवायची आहे. यासाठी फार व्यावसायिक पद्धतीचे ध्वनिमुद्रणाची आवश्यकता नाही. गीताचे शब्द, स्वररचना आणि गायकी यांची कल्पना येईल असे ध्वनिमुद्रण प्राथमिक निवडीसाठी पुरेसे आहे.
स्पर्धेसाठी आलेल्या सीडीज ऐकून अधिकारी, जाणकार व्यक्तींची परीक्षक समिती ही प्राथमिक निवड करेल त्यातून निवडलेले संघच अंतिम स्पर्धेत सहभागी होतील.

अंतिम स्पर्धा पुण्यात शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०१५ रोजी घेतली जाईल . अंतिम स्पर्धेच्या परीक्षणासाठी सुगम संगीत क्षेत्रातील जाणकार अधिकारी व्यक्ती असतील त्यात कवी, संगीतकार, गायक / गायिका , वादक, संगीताचे अभ्यासक यांचा समावेश असेल. परीक्षक समितीचा निर्णय अंतिम मानला जाईल.

वाद्यमेळ हा निर्विवाद महत्वाचा असला तरी ह्या स्पर्धेत त्याचा स्वतंत्र विचार होणार नाही. वय वर्ष १८ वरील कुणाही स्त्री पुरुष कलाकाराचा संघात समावेश होऊ शकेल. कमाल वयोमर्यादा ठेवली नसली तरी प्रामुख्याने सध्याच्या युवा पिढीचा सहभाग अधिक अपेक्षित आहे. मात्र अगोदर प्रकाशात असलेल्या व्यावसायिक कलाकारांना ह्या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. मराठी भावगीताची स्पर्धा असली तरी ती महाराष्ट्रापुरती सीमित नाही. सर्व प्रांतातून, देशभरातील व परदेशातील मराठीजन यात सहभागी होऊ शकतात.

कवी, संगीतकार, गायक कलाकार अशा सामुहिक / सांघिक स्वरूपातच या स्पर्धेत भाग घेता येईल. केवळ एक व्यक्ती म्हणून सहभागी होता येणार नाही. सामान्यत: संगीतकार हा संघाचा प्रमुख असेल. एखाद्या संघाबरोबर नवा कवी उपलब्ध नसेल तर मराठी काव्य विश्वातील कुठलीही नवी अगर जुनी कविता निवडून ती स्वरबद्ध करून नव्या गायक कलाकाराकडून सादर करता येईल, तथापि नवा कवी / नव्या रचनेची चांगली निवड याचा पारितोषिकासाठी विचार केला जाईल. कवी, संगीतकार, गायक कलाकार या तिन्ही भूमिका एकाच व्यक्तीत असू शकतील अशा प्रसंगी अशी एक व्यक्तीच संघ म्हणून मानली जाईल .

 

कधी दोन व्यक्ती या तीनही भूमिका सांभाळू शकेल. अंतिम स्पर्धेतून तीन सांघिक विजेते संघ निवडले जातील. प्रथम संघास रु.१०,०००/- व गजाननराव वाटवे करंडक दिला जाईल. द्वितीय संघास रु.७,०००/- तर तृतीय संघास रु.५,०००/- चे रोख पारितोषिक असेल . याशिवाय सर्वोत्कृष्ट कवी, संगीतकार, गायक आणि गायिका अशी चार स्वतंत्र व्यक्तिगत पारितोषिके प्रत्येकी रु.२०००/- असतील.

ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी प्राथमिक फेरीसाठी कवितांच्या चार प्रती आणि सहभागी कलाकारांच्या माहितीसह आपली परिपूर्ण सीडी खालील पत्यावर ३० जानेवारी , २०१५ पूर्वी पाठवाव्यात.

संपर्क :
श्री. प्रकाश भोंडे
कार्यकारी विश्वस्त
स्वरानंद प्रतिष्ठान
४०/३२, भोंडे कॉलोनी ,
कर्वे रोड,
पुणे - ४११ ००४.
फोन : २५४४ ७१ ६७
मोबाईल : ९३७११ ३४ ६३६

 

वाटवे करंडक २०१

© Swaranand Pratishthan                                                                                                                                                                                       Created by : Maitreyi Graphics